Posted by: manimanasi | एप्रिल 10, 2011

ये आकारा


“अनिता ए अनिता, अग बाल्कनीमध्ये काय करते आहेस एवढा वेळ? चल लवकर.”
“आले, आले”
“चल आता निघू या.तुला डॉक्टरकडे नेवून आणून मला ऑफिसला जायचय.”
“अरे, आपल्या बिल्डिंगच्या मागे जी रिकामी जागा होती ना तिथे बहुधा बांधकाम सुरु होणार आहे असे वाटतंय  “
“तरीच मागच्या महिन्यात एकदम तिथे काँग्रेस गवत काढून टाकणे चालू होते. तारेचे कुंपण घालत होते.”
“काय म्हणतील रे डॉक्टर? आपल्याला हवी ती गोड बातमी देतील?”
“देतील का काय? देणारच.”
……
……
……
“हॅलो …. सासूबाई, मी अजय बोलतो आहे. एक चांगली बातमी सांगायची आहे. तुम्ही आजी होणार आहात.”
“अरे वा! आनंदाची बातमी आहे कि ही. कशी आहे अनिता? कितवा महिना आहे? डॉक्टर काय म्हणाले?”
“अनिता इथे माझ्या शेजारीच आहे. तुम्हीच बोला तिच्याशी.”
“अग आई, तिसरा महिना सुरु झालाय.”
“अनिता, मी उद्याच येते तिकडे. वाटल्यास तुझ्या सासूबाईना पण घेवून येते.”
“ये ये आई. सासूबाईना पण घेवून ये.”
“हो, आणि येताना तू माझ्याबरोबर पुण्याला ये. पहिलीच वेळ आहे तुझी.माझ्या नजरेसमोर राहशील. तुझे डोहाळे पुरवता येतील मला. म्हणजे काही काळजी नाही मला.”
“आई, डॉक्टर म्हणाले काळजीचे काहीही कारण नाही. दर महिन्याला एकदा दाखवायला या म्हणाले डॉक्टर आणि पाचव्या महिन्यापासून दर महिन्याला एक सोनोग्राफी करूया असे म्हणाले.”
“तुम्ही तिथे इतक्या लांब बंगलोरला राहायला गेलात, काळजी वाटते मला.”
“त्यात काय एवढे?”
“ते आता तू आई झालीस कि कळेल तुला.”
……
……
……
“अजय, आपल्या बाळाचे नाव आकाश ठेवू या का ?”
“हे नाव कसे काय सुचले तुला ?”
“आज त्या बांधकामाच्या इथे पाटी लागली ना ‘आकाशगंगा अपार्टमेंटस ‘, तेव्हापासून मला आकाश नाव एकदम आवडायला लागले आहे.”
“आणि मुलगी झाली तर?”
“तर मग तू ठरवशील ते नाव.”
“ठरलं तर!”
……
……
……
“काय मग? कुठवर आली तुझी बिल्डिंग?”
“आज सकाळी सकाळी  इमारतीकरता मापे घेणे चालू होते. २-३ इंजिनिअर्स आले होते.त्यांनी बिल्डिंग च्या मापानुसार पांढर्या वाळूने जमिनीवर  रेघा काढल्या. उद्यापासून बहुधा पाया खोदायला लागतील असे वाटते आहे. आणि ४-५ कामगारांची कुटुंबे पण राहायला आली आहेत बघ. २-३ तास चालू होते काम.”
“बरं”
“दुपारी मी झोपले. मला पोटात खूप जड वाटत होते. वाटतय कि पोटात एक क्रिकेटचा बॉल आहे आणि तो जागचा हलतच नाही आहे.”
“डॉक्टरांना फोन  नाही का करायचास ?”
“केला होता. डॉक्टर म्हणाले कि हे नॉर्मल आहे. बाळ एक जागा निश्चित करून आता तिथेच वाढू लागेल.”
……
……
……
“अजय, आज काय झाले सांगू बांधकामावर ?”
“तुला ते बांधकाम पाहत बसायचा नादच लागला आहे कि काय ?”
“हो. अगदी खरे आहे.मला टीव्ही आणि इंटरनेटपेक्षाही नवीन काही तरी मिळाले आहे वेळ घालवायला.”
“सांग तर. रोज त्या बांधकामाचे पुराण ऐकल्याशिवाय माझे जेवण कसे होणार ?”
“आज ना पहिली स्लॅब पडली. मी कधीच पाहिले नव्हते स्लॅब पडणे म्हणजे काय? त्या ज्या लोखंडी सळ्या उभारल्या होत्या ना ते म्हणेजे सांगाडे. त्याच्या आधारे आज अनके लाकडाचे साचे उभारले गेले. एकदा का काम सुरु झाले ना कि किती आरडाओरडा करतात ते मुकादम. कामगार
पटापट कॉंक्रीट आणून टाकत होते. मला पायाला रग लागली तेव्हा समजले कि मी बराच वेळ उभी होते ते.”
“तू अशी इतका वेळ उभी राहत जावू नकोस. त्रास होईल तुला.”
“मी आज एवढा वेळ उभी राहिले कारण आपल्या बाल्कनी मधून ही पहिली स्लॅब बरोबर दिसली. माझ्या नजरेच्या पातळीवरच होती.पण पुढच्या वेळेस दुसरा मजला आपल्या बाल्कनी मधून दिसणार नाही. उंचावर असेल ना
तो.”
“मी असे करतो, उद्या तुझ्याकरता बाल्कनी मध्ये झोपाळा बसवून घेतो.म्हणजे तुला झोपाळ्यात बसून तुझे पुस्तक वाचता येईल,विणकाम करता येईल. तुझे बांधकाम देखील बघता येईल. आणि सगळ्यात महत्वाचे – मस्त झोके घेत बाळाशी गप्पा मारता येतील”
“बाळाची हालचाल कधी सुरु होणार असे वाटते आहे. सध्या तरी मी बाळाचे वाढते वजन फक्त अनुभवते आहे. आणि माझा खादाडपणा.”
……
……
……
“आई, तू आलीस म्हणून मला किती किती बरे वाटतेय ग”
“अग पाचवा महिना लागला ना आता तुला? चोरचोळी नको करायला? शिवाय तुझी पहिली सोनोग्राफी पण आहे ना?”
“आणि काय ग मला अजय सांगत होता की हल्ली तुझा मुक्काम बाल्कनी मध्येच असतो म्हणे.”
“हो ना. अग तिथे काम करणाऱ्या लोकांना पण माहित झाले आहे कि मी इथेच झोपाळ्यात बसून त्यांचे काम तासंतास पाहत असते.तिथे काम करणाऱ्या २-३ बायका आहेत ना, त्या पण मला खुणा करून विचारत असतात  बाळ कसे आहे म्हणून? काल मी दिवसभर बाल्कनीमध्ये गेले नाही. दोन नव्या मैत्रिणी आल्या  होत्या घरी. तर आज सकाळी त्या बायका विचारत होत्या कि मी ठीक आहे ना?”
” बघू तरी ती बिल्डिंग”
” चल ना. तुला दाखवते.”
“अग हो, हळू चाल. किती वेळा बजावले तुला. पोट बरेच दिसू लागलाय कि.”
“हे बघ आई किती सुरेख बांधकाम आहे. तीन मजली बिल्डिंग आहे. रोज संध्याकाळी सगळ्या बिल्डिंगला पाणी मारतात आणि आजूबाजूला पण. मला तर तो मातीचा वास प्रचंड आवडतो. तो वास सतत घेता यावा म्हणून मी
पण थोड्या कुंड्या आणल्या आहेत. मी पण त्या कुंड्यावर पाणी मारून त्या कुंड्याना नाक लावून तो श्वास  खोलवर भरून घेते. संध्याकाळी तर इथे इतके छान  दिसते समोर. दमून भागून वाळूच्या ढिगावर पहुडलेले  कामगार,
त्यांच्या बायका त्या झोपड्याबाहेरच बसून स्वयंपाक बनवत असतात. त्याचा निळा जांभळा धूर. ती २ छोटी  मुले आहेत ना ती त्या बाईची. आणि आई, ह्या बिल्डिंगच्या बरोबर मागे सूर्यास्त होतो ते पण खूप छान दिसते . अजय येईपर्यंत माझा वेळ अगदी मजेत जातो.”
……
……
……
“अजय मला खूप कंटाळा  आलाय.”
“का ग? बिल्डींग पाहून  मन  भरले  का?”
“अरे, सामसूम आहे तिथे सगळीकडे. स्लॅबचे काम संपून अडीच महिने  झाले. एक माणूस  फक्त सकाळ  संध्याकाळ  पाणी मारून  जातो  त्या स्लॅबवर.”
“तू अशी कंटाळू  नको.असे उदास  राहणे  बरे  नाही. आपलं बाळपण असेच होईल बरं!”
“तिथे उलट आता मला हालचाल  जाणवू  लागली आहे. कधी  कधी  तर इतक्या  गरकन  ते बाळ  हलतं ना की मला कशाचातरी आधार घ्यावा लागतो . तेव्हा मी गडबडते.  आणि बाळाचे गपकन  फिरणे  थांबले  कि मला खूप हसू  येते.”
“डॉक्टर काय म्हणतायेत?”
“त्यांच्या  मते  बाळाचा आकार  आता पूर्ण  तयार  झालेला असतो. आणि आता स्नायू  तयार  होत असतात.  बाळाचे वजन  वाढू लागते आणि मग शेवटी  शेवटी  केस  नखे असे नाजूक अवयव  आणि मुख्य  म्हणजे  मेंदू विकसित होतो. अजय सध्या मला काय वाटते  सांगू ?”
“सांग ना “
“माझ्या पोटात  एक नव निर्मिती आकार घेत आहे. आणि माझ्या समोर ही एक बिल्डींग आकार घेत आहे. एक देवाने  घडवलेली निर्मिती आणि एक मानवाने  घडवलेली.”
……
……
……
“मी आज  खूप  खुश  आहे . खूप  वर्दळ  सुरु  झाली  आहे  बांधकामावर”
“कसली वर्दळ?”
” कामगार  जास्त दिसत आहेत, पूर्वीपेक्षा. फारशा येवून पडल्या आहेत. नळ आणि पाईप येवून पडले आहेत. २-३ महिने एकदम शांत होते हे लोक आणि आता एकदम २ महिन्यात सगळे पूर्ण करायला निघाले आहेत.”
“तुला अजून एक खुश खबर! तुझ्या आईने तुझे सातव्या महिन्यातले डोहाळजेवण इथेच करायचे ठरवले आहे. बरेचजण येणार आहेत. २५-३० जण तरी असतील सगळे मिळून. आपल्याला इथे फक्त एक केटरर शोधून ठेवायचा आहे. बाकी सगळी तयारी तुझी आणि माझी आई घेवूनच येणार आहेत.”
“मजा येईल ना”
“अग, पण तू कोठे होतीस ४ वाजता? घरचा फोन कोणी उचलत नाही आहे असे म्हणाली तुझी आई.”
“अरे मी खाली गेले होते. ती बांधकामावरची बाई आहे ना, २ मुले असलेली. काल मी तिच्या मुलांकरता २-३ लाकडाची रंगीत खेळणी आणली होती. ती द्यायला गेली होती. खूप आनंद झाला बघ त्या बाईला. कानडी मधून खूप काही बोलत होती. शेवटी कानावर बोटे मोडून माझी दृष्ट पण काढली तिने.”
……
……
……
“अजय, मला पुण्याला जावेसेच वाटत नाही आहे. माझी खूप द्विधा मनस्थिती झाली आहे. बाळाला पण लवकरात लवकर पाहायचे आहे आणि कधी कधी वाटते कि ही बिल्डिंग पूर्ण झालेली पहावी आणि मगच जावे. आता फाटक लावतील, नाव देतील बिल्डिंग वर …सगळे काही मला पाहायचे आहे.”
“झाली ना पूर्ण बिल्डिंग? तूच तर म्हणत होतीस कि भिंती,प्लास्टरिंग, खिडक्या, फरश्या बसवणे सगळे काही फटाफट झाले मागच्या एक दीड महिन्यात”.
“हो, खूपच काम झाले मागच्या काही दिवसात. पण मुख्य रंग लावणार आहेत ह्या आठवड्यामध्ये. मग फाटक लावतील, नाव देतील बिल्डिंग वर …सगळे काही मला पाहायचे आहे.”
“तुला बेड रेस्ट वगैरे काही नाही म्हणून तुझी आणि माझी आई तुला इथे आठवा महिना पूर्ण होईपर्यंत राहू देत आहे. आणि म्हणून तुला बिल्डिंग इतकी पाहायला मिळाली आहे. आता मला सक्त ताकीद आहे कि तुला नववा महिना लागताच तुझ्या माहेरी पोचवले पाहिजे.”
“आपलं बाळ काय म्हणतं आहे?”
“तिथे पण खूपच प्रगती आहे. अरे, मी त्याच्याशी सारखी बोलत असते. मी पोटावर हात ठेवला कि ते बाळ जागे होते जणू. पाय हलवायला लागतं. माझा आवाज ओळखतं. माझा स्पर्श समजतो त्या बाळाला.हालचाल तर खूपच आहे.”
“बर चल अनिता, तयारीला लाग. उद्या दुपारी ४ चे विमान आहे.”
……
……
……
“अनिता, कसा आहे माझा मुलगा?”
“मस्त गुब्बू गुब्बू आहे. बघ. एकदम सिम्बा. पण बाबांवर रागावला आहे, उशीरा आल्याबद्दल”
“अग, मला काल संध्याकाळी ७ वाजता तुझ्या बहिणीचा फोन आला कि तुम्ही दवाखान्यामध्ये निघताय म्हणून. मी रात्रीच्या १०च्या विमानात जागा मिळतेय का ते पाहिले. पण नाही मिळाली. आत्ता सकाळी ९ च्या फ्लाईटच तिकीट मिळालं.”
“मी आत्ता जेव्हा तासापूर्वी आपल्या बाळाला प्रथम जवळ घेतले, तेव्हा मी तुझ्या नजरेने आपल्या बाळाकडे पाहत होते.”
“आणि काल संध्याकाळी  मी काय करत होतो, माहित आहे? संपूर्ण संध्याकाळ मी तुझ्या  नजरेने तुझ्या बिल्डींगमधली पहिली वास्तुशांत पाहत होतो.”
Posted by: manimanasi | नोव्हेंबर 9, 2010

पार्टी गेम्स

 पार्टी गेम्स

हे खेळ प्रामुख्याने जोडप्यांसाठी आहेत.

१.खेळ पहिला=बायकोला दागिने घालणे.

पार्टीला यायच्या आधीच यजमानांनी बायकांना जास्तीत जास्त दागिने घालून यायला सांगावे. खेळ सुरु करण्यापूर्वी बायकांनी हे सगळे दागिने एखाद्या ताटलीत घेवून खुर्चीवर बसावे. आणि मग नवर्यानी हे सर्वं दागिने बायकोच्या अंगावर परत घालावेत. जो सगळ्यात आधी सर्वं दागिने बायकोला घालेल तो जिंकला.यात बायकांनी कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. बोलून किंवा एक एक दागिना हातात देवून वगैरे.गुपचूप बसून राहायचे.
(अवघड आहे नाही ? आणि नवर्याला सूचना नाही द्यायच्या तर कोणाला द्यायच्या ? )

२. खेळ दुसरा=बायकोला पायघड्या घालणे

वर्तमान पत्राचे फुलस्केप आकाराचे २ तुकडे नवरे मंडळी कडे देवून ठेवा.एक ठराविक अंतर पार करून जायचे आहे. बायका एका रेषेच्या मागे उभ्या राहतील आणि वेळ सुरु होताच नवर्याने बायकोला ती वर्तमान पत्रे एका पुढे एक ठेवत बायकोला एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचवायचे आहे.(फोटो काढायला विसरू नका हो ! )
बायकोचा पाय जमिनीवर पडता उपयोगी नाही.अर्थातच जी जोडी आधी पोचेल ती जिंकली.

३.खेळ तिसरा=घरातले सामान कमी करणे. का ssss य ? ऐका तर खर ……

या मध्ये नवरा आणि बायको ह्या दोघानाही काही लिहायचे आहे.
घरातली एखादी वस्तू अशी असते की ती वापरलीही जात नाही आणि टाकून ही देववत नाही.स्वताच्या घरातील अश्या एक वस्तूचे नाव प्रत्येकाने कागदाच्या सुरुवातीला लिहायचे. आणि मग त्याखाली ती वस्तू का टाकून द्यायची आहे त्याची ५ कारणे लिहायची.शेवटी स्वताचे नाव लिहायचे.

आता हे लिहून झाले कि सगळे कागद सुत्राधाराकडे द्यायचे.या खेळाला वेळेचे बंधन नाही.कितीही वेळ घ्या लिहायला.

आता सूत्रधार एकेक कागद वाचून दाखवेल. फक्त तो वाचून दाखवताना एक बदल करेल की जे वस्तूचे नाव लिहिले असेल त्याच्या ऐवजी खाली ज्या व्यक्तीचे नाव आहे त्या व्यक्तीच्या जोडीदाराचे नाव वाचेल.
उदा. सायकल टाकून द्याची असेल असे जर श्री.क्ष यांनी लिहिले असेल तर वाचताना तो म्हणेल सौ.क्ष यांना टाकून द्यायचे आहे. ही घ्या कारणे ५.

धमाल ना …..

Posted by: manimanasi | सप्टेंबर 23, 2010

First Things First

आपण सगळेच जण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये वेळेचे नियोजन (Time Management) करत असतो. त्या विषयावरची वेगवेगळी पुस्तके वाचत असतो, टिप्स मिळवत असतो. अश्याच एका प्रयत्नामध्ये काही वर्षांपूर्वी  माझ्या वाचनात एक उल्लेखनीय  पुस्तक आले.ते पुस्तक आहे Stephen Covey चे First Things First. तुम्ही वाचले आहे का हे  पुस्तक ? ज्यांनी अजून वाचलेले नाही त्यांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
 
या पुस्तकामध्ये एक छान गोष्ट मांडली आहे, ती  म्हणजे आयुष्य  अर्थपूर्ण आणि परिपूर्ण  बनवण्यासाठी वेळेचे  गणित कसे मांडायचे या विषयीचे मार्गदर्शन.आयुष्यात Time management सगळ्यांनाच करावे लागते.पण आयुष्य सुंदर करण्याकरता, आयुष्याला अर्थ देण्याकरता फक्त तेवढेच करून भागत नाही, तर प्रथम आपल्या विचारांची दिशा बदलावी लागते. आणि हेच लेखकाने या पुस्तकात सांगितले आहे.
  
वेळेचे नियोजन या विषयावर आत्ता पर्यंत अगणित पुस्तके लिहिली गेली आहेत. कमी वेळात जास्त कामे कशी करावी ,वेळेची आखणी कशी करावी,अशी अनेक वेळेशी   निगडीत असलेली  तंत्रे  शोधली गेली.उदा. यादी बनवा, किंवा प्राधान्य ठरवा किंवा कामे दुसर्यावर सोपवा,ए बी सी अनालिसिस करा,८०-२० चा नियम लावा असे उपाय एका पाठोपाठ विकसित झाले.पण हे सगळे उपाय होते कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसे करायचे ह्या प्रश्नाशी निगडीत. लेखकाच्या मते ही सगळी कालबाह्य तंत्रे झाली. ह्याचा उपयोग नाही असे नाही. पण आयुष्य अर्थ पूर्ण बनवण्य करता आयुष्याचे सुकाणू कोणत्या दिशेला जात आहे हे ओळखणे  जास्त महत्वाचे आहे असे लेखकाला वाटते..

  लेखक म्हणतो आपण कितीही वेळेचे  उत्तम नियोजन केले तरी आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी करायला वेळ  बाजूला काढता येत नाही. त्यामुळे  किती तरी मनातल्या गोष्टी मनातच राहून  जातात. वाटते, काय अर्थ आहे या आयुष्याला? अश्या वेळेस काय करावे? पुस्तकाची सुरुवातच लेखकाने अशी केली आहे कि सांगा तुमच्या मनात  अशा कोणत्या गोष्टी आहेत कि ज्या केल्याने तुम्हाला तुमचे आयुष्य सार्थकी लागले असे वाटणार आहे? या वर्गात बसणाऱ्या फक्त ३-४ महत्वाच्या गोष्टी लिहून काढा. ठरवा तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे. मग लेखक विचारतो कि या ३-४ गोष्टीना तुम्ही पुरेसा वेळ देत आहात का, याचा विचार करा. किंवा असा विचार करा  कि तुमच्या साठीशांतीला तुमच्याबद्दल लोकांनी काय म्हणावे  असे तुम्हाला वाटते? या  प्रश्नामधून आपल्याला अनेक प्रश्नाची उत्तरे सापडतात. या प्रश्नामध्ये उभ्या आयुष्याचे गमक दडलेले आहे. या ३-४  गोष्टी म्हणजेच First Things  आणि या First Things ना  आयुष्यात प्राधान्य द्यायचे ह्याबद्दल लेखकाने मार्ग सांगितले आहेत.

खरे तर आपल्याला हे अनेकदा जाणवत असते कि आपण आपल्या रुटीन मध्ये, रोजच्या जबाब दार्या  मध्ये किंवा अचानक उपटणार्या   प्रश्नात इतके  अडकून गेलेलो असतो की आपण  कसे जगायचे ठरवले होते, कसे स्वताला घडवणार होतो, कसे मुलांना वाढवणार होतो, हे सगळे विचार काळाच्या ओघात मागे पडले आहेत. कधी तरी अंतर्मुख झाल्यावर जाणवते की नकळतपणे आपण ऐहिक सुखाच्या मागे धावतो आहोत, अनुभव गोळा करण्या पेक्षा वस्तू गोळा करणात धन्यता  मानतो आहोत. या सगळ्यामुळे व्यक्ती म्हणून स्वताची उन्नती करायचे पार विसरून गेलेलो आहोत. मग आपण  ‘ वेळ कोठे मिळतो ?’  या सबबी खाली हे सगळे विचार झटकून टाकतो आणि परत पहिले पाढे पंचावन्न. पण यामध्ये तुम्ही  आनंदी नसता, समाधानी नसता. 

 लेखक म्हणतो जोवर तुम्ही एक अर्थपूर्ण,परिपूर्ण  जीवन जगत नाही तोवर तुम्हाला तुमच्या  आयुष्याला काही अर्थ आहे असे वाटत नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला  फक्त अर्जंट आणि महत्वाची कामे करायची सवय असते,आणि या ज्या First Things आहेत त्या महत्वाच्या जरी असल्या तरी नेहमीच नॉन अर्जंट असतात आणि म्हणूनच त्या बाजूला पडतात. लेखक प्रथम आपल्याला ही सगळी महत्वाची,अर्जंट, नॉन अर्जंट, कमी महत्वाची कामे ओळखायला शिकवतो आणि मग First Things ला प्राधान्य द्यायला शिकवतो. रोजच्या रुटीन मध्ये ते कसे बसवायचे हे सांगतो. हे सांगत असताना लेखकाने अनेक शक्यता पण विचारात घेतल्या आहेत. जसे की माणूस म्हणजे काही यंत्र नव्हे. भावना  मध्ये येतात, नाती सांभाळावी लागतात ,अनपेक्षित घटना घडतात. या सगळ्या गोष्टी आपल्या रुटीनचा पार बोर्या वाजवतात. या सर्व अडथळ्यांचा, शक्यता-अशक्यताचा विचार करत, हा कठीण  वसा कसा सांभाळायचा हे लेखकाने  सांगितले आहे.

 हा वसा काही सोपा नाही. रोज च्या रोज नियमा  प्रमाणे वागणे शक्य नसते. त्या करता  सगळ्यात आधी गरज पडते मनोनिग्रहाची. हा मनोनिग्रह कसा मिळवायचा हे पण लेखकाने फार सुरेख पद्धतीने सांगितले आहे. तसेच कधी नियम वाकवणे (किंवा वेळप्रसंगी  मोडणे) योग्य असते यावर देखील  मार्गदर्शन केले आहे.
 
पुस्तक मोठे आहे – ३०० पानांचे. आणि त्यात पानोपानी इतके काही सांगितले आहे कि ते पुस्तक एका बैठकीत बसून संपवण्यासारखे नाही. लेखकाने असंख्य प्रशन विचारून आपल्याला अन्तर  मुख होण्यास प्रवृत्त केला आहे. प्रत्येक प्रकरण वाचून झाल्यावर त्यात सांगितलेल्या गोष्टींवर विचार करून, मनन चिंतन करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कश्या समाविष्ट करता येतील किंवा आपल्या आयुष्यात कोणते बदल करायला हवे आहेत याचा आढावा घेऊन मगच पुढचे प्रकरण वाचले तर त्याचा खूप परिणाम होतो.
 
अश्या असंख्य मार्गदर्शक तत्वांनी भरेलेले हे पुस्तक आहे. पुस्तक  जेव्हा संपते तेव्हा आपल्याला आपण स्वताला एक समृद्ध  व्यक्ती म्हणून कसे घडवायचे ,कसे आयुष्य परिपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवायचे हे कळलेले असते. कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे ,कधी काम-धाम विसरून ते ते क्षण फक्त मनापासून उपभोगायचे अश्या अनेक आत्ता पर्यंत न सापडलेल्या  कित्येक प्रश्नाची उत्तरे सापडतात आणि हे उत्तरे दुसर्या कोणी आयती दिलेली नसून तुमची तुम्हीच शोधून काढलेली असतातात. .आपल्या सगळ्या मर्यादांचा,शक्यतांचा विचार करून आपण आपला मार्ग ठरवलेला  असतो. ही या पुस्तकाची फार मोठी जमेची बाजू आहे. हे पुस्तक मग आपले ‘गीता भागवत’ न झाले तर च नवल.

 

 
 
 
 

 

 

 

 
Posted by: manimanasi | सप्टेंबर 13, 2010

माझ्या आठवणीतले गणपती गौरी

“गणपती बाप्पा मोरया” चा गजर ऐकला की मन एकदम २५ वर्षे मागे जाते. दोन वेण्या आणि फुलाफुलांचा फ्रॉक घातलेलं गणपती समोर हात जोडलेलं माझे रूप माझ्या डोळ्यासमोर येते. आणि मनात रुंजी घालू लागतात तेव्हाच्या  गणपती गौरीच्या  आठवणी. गणपती गौरी हा माझा सगळ्यात  आवडता सण.
 
माझे माहेर पुण्याचे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती आणि उभ्याच्या गौरी असतात. एक ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा. आमचे  कुटुंब खूप मोठे होते. घरात माझे वडील थोरले. त्यांच्या पाठोपाठ ४ काका आणि एक आत्या. सर्वजण पुण्यात असूनही प्रत्येकाचे रहाते घर वेगळे होते. पण घरातले गणपती गौरी, दिवाळी सारखे सण मात्र एकत्रितपणे साजरे केले जायचे. गणपती गौरी करता सगळे काका काकू, माहेरवाशीण आत्या आणि आम्ही चुलत आणि आत्ते भावंडे मिळून १२ भावंडे आमच्या घरी एकत्र जमत असू. आमच्या घरात मी सगळ्यात थोरली.  त्यामुळे मी सगळ्या भावंडांची ताई होते. मी आणि माझ्या दोन बहिणी मिळून या सर्व चुलत आत्ते भावंडांची काळजी घ्यायचो.
शाळेची पहिली चाचणी परीक्षा संपली की गणपतीचे वेध लागायचे. घरात गणपतीचे वातावरण सुरु व्हायचे.  गणपती यायच्या आधी ४-५  दिवसापासून रोज थोडे असे करत  धाकटा काका-काकू  आणि आम्ही बहिणी  मिळून गणपतीचे मखर बनवत असू. त्या काळी तयार  मखर मिळत नसे. काकाला दर वर्षी नवीन मखर करायचा उत्साह असायचा. तो थर्माकोल, घोटीव कागद, झिरमिळ्या आणून   मखर आणि सजावट करायचा. आम्ही आपले लिंबू टिंबू मदतीला. आणि काकू अधून मधून वातावरण चेष्टा मस्करीचे  ठेवायला. दुसर्या दिवशी शाळा असली तरी  रात्री जागून आम्ही मखर बनवायचो.
 
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती  घ्यायला आम्ही सगळेच्या सगळे २२-२५ जण पायी शनिवार वाड्याच्या पटांगणात  उभारलेल्या मंडपात जायचो. माझ्या आजोबांनी आमच्या घराण्याची गणपतीची मूर्ती कशी असावी याचा तपशील लिहून ठेवलेला होता. म्हणजे चार हात दिसले पाहिजेत, सिंहासनावर बसलेला हवा, डाव्या सोंडेचा हवा, ठराविक उंचीचाच हवा, वगैरे वगैरे अश्या अनेक नियमांशी  मिळता जुळता गणपती शोधण्यात २-३ तास आरामात जायचे. आम्ही मुले दर १५ मिनिटानी सरबताची तहान किंवा भेळेची भूक एकेका काकाला गूळ लावून भागवून घ्यायचो. घरातला प्रत्येक जण मूर्ती खरेदी करताना स्वतःचे मत द्यायचा. प्रत्येकाला  आवडेल अशीच  मूर्ती घ्यायची  असा माझ्या बाबांचा  आग्रह असे. आमच्या घरच्या रिवाजाप्रमाणे एकदा का गणपती घेतला कि मग कोणीही  काहीही न बोलता सगळे जण घरी परत यायचो. परतीच्या वाटेवर आम्ही छोटी भावंडे कोणी एकमेकांशी बोलत नाही याकडे लक्ष ठेवत शुक शुक अश्या खुणा करत चालायचो.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गुरुजी येवून गणपतीची प्रतिष्ठापना करायचे. एकदा का प्रतिष्ठापना झाली की घर एकदम प्रसन्न वाटू लागे. मग पुढचे १० दिवस घरात दर्शनासाठी अनेक लोक यायचे. रोज संध्याकाळी आरती अगदी धूम धडाक्यात व्हायची.  आमच्या जवळपासच्या घरातली सगळी मंडळी, आम्हा तिघी बहिणीचे  मित्र-मैत्रिणी  आणि नातवाईक आवर्जून आरतीला यायचे. चढाओढ लावून रोज अनेक आरत्या आम्ही म्हणत असू. गणपतीची हिंदी आरती आणि व्यकटेशाची आरती फक्त मला आणि माझ्या आईला येत होती, त्यामुळे मी अगदी फुशारून जावून दर वेळेस ती आरती म्हणायचीच. 
 
संध्याकाळी बाहेर दूरवर सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी लागली जाणारी गाणी ऐकू यायची. सुदैवाने आमच्या घराजवळच्या सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी फक्त भजने किंवा देवाची गाणी लावली जायची. हिंदी सिनेमाची गाणी लावली जात नसत.त्यामुळे संध्याकाळी  दूरवर लताच्या आवाजातली ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ऐकू आले की हातातली कामे टाकून गणपतीच्या मूर्ती समोर शांतपणे उभे राहावे असे वाटे.  अश्या वातावरणात ती आरती अजूनच मंगलमय, प्रसन्न वाटायची. कधी भीमसेन जोशीची अभंगवाणी  तर कधी संध्याकाळी प्रल्हाद  शिंदे यांची  ‘बाप्पा मोरया रे’  सारखी गाणी.  ही गाणी खूप  दुरून ऐकू यायची आणि शांत वाटायचे. 
 
गणपतीची प्रतिष्ठापना झाली की लगेच वेध लागायचे गौरीच्या स्वागताचे. आई आणि एखादी काकू तुळशी बागेतून गौरी आणि तिच्या बाळाच्या  शाडूच्या मुखवट्यांची खरेदी  करून यायच्या. २ मुखवटे गौरी करता आणि २ तिच्या बाळाकरता. मग गौरी बसायच्या दिवशी आई आणि काकू गौरींना सजवायची. गणपतीच्या पुढ्यात गौरी बसवल्या जात. गौरीना साडी नेसवणे आणि दागिने घालणे मला खूप आवडायचे. आम्ही लहान असताना समोर बसून फक्त बघत असू. पण दहावी नंतर मलापण एक गौर सजवायला मिळू लागली. हा प्रकार खरेच खूप अवघड असतो. नवी कोरी साडी त्या गौरीच्या stand ला नेसवायची  म्हणजे खूपच कौशल्याचे काम असते. माझी आई त्या करता दर वर्षी २ नव्या  महागड्या साड्या विकत आणायची. अतिशय नाजूकपणे ,सुबकपणे ती साडी नेसवावी लागे. साडी, मंगळसूत्र आणि इतर दागिने असे सगळे करून झाले की मुखवटे म्हणजेच गौर वाजत गाजत घरी आणायचो.
 
गौरीच्या स्वागताकरता घरभर रांगोळीने गौरीची पावले काढली जात आणि त्यावर हळदी कुंकू वाहिले जाई. स्वयंपाक घरात, कपाटापाशी, घरातल्या लॉकरपाशी, देव्हार्यापाशी  अश्या  सगळ्या ठिकाणी ही पावले काढली जायची. मग त्या मुखवट्यावर खण पांघरून  आई आणि एखादी काकू  डोक्यावर आणि दोन्ही खांद्यावर  पदर घेवून  बंगल्याच्या फाटका पासून गौर  घेवून येत. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळी लहान मोठी मुले, घरातल्या इतर बायका  घंटा झांजा, वाटी-चमचा वाजवत येत असू. असे वाजत गाजत येताना  आम्ही सगळे म्हणायचो ” महालक्ष्मी आली” आणि मग जिच्या हातात गौरी आहेत त्या दोघी एकदम म्हणायच्या “सोन्याची पावले”. दाराच्या उंबर्यात आल्यावर मुखवटे उबर्याला स्पर्श करून आणि तांदळाचे माप ओलांडून गौरी घरात प्रवेश करायच्या. घरात गौर आली की तिला सगळे  घर दाखवायचो. प्रत्येक ठिकाणी आल्यावर गौरीला विचारायचे “गौरी गौरी, कुठे आलीस?” मग गौर म्हणे “स्वयंपाकघरात”. गौर विचारी “इथे काय आहे?”. मग आम्ही म्हणायचो “धान्य  आहे”. त्यावर  गौर म्हणे “भरून वाहू दे”. गौर येईल ओट्यापाशी. “इथे काय आहे?”. आम्ही सांगायचो  “रुचकर पदार्थ आहेत, गोडधोडाचे पक्वान्न आहे”. मग गौर म्हणे “भरून वाहू दे”…….
 
असे सगळीकडे गौर फिरून आली की  हे मुखवटे सजवलेल्या stand वर हलक्या हाताने बसवले जात. एकदा का गौर बसवली कि ती अजिबात हलवायची नसते. त्या गौरीच्या पुढ्यात त्यांची बाळे आणि ओटी ठेवायची. गौरी सोवळ्यातल्या असल्यामुळे तिथे इतर काही डेकोरेशन किंवा फराळाचे पदार्थ ठेवायचे नसतात. फक्त ५ फळे ठेवायची ज्या मध्ये कणीस असलेच पाहिजे. गौर बसवून झाली कि मग गौरीची आरती होत असे. पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवैद्य दाखवला जाई.
 
आमच्या घरात एक समजूत आहे. ती  म्हणजे जी सून (माझ्या आजोबांची) गौर घेवून येते तिचा भास त्या गौरी मध्ये होतो. म्हणजे एक काकू जाड  होती तर एक उंच होती. त्यानी गौरी आणल्या तर त्यांचे प्रतिबिंब गौरी मध्ये दिसे. गौरीच्या  पोटात मिठाई ठेवायची  प्रथा होती. आणि हळदी कुंकवाने  भरलेली कोयरी. आमची समजूत अशी की जर गौरीचे सगळे काही नीट यथासांग केले कि त्या मध्ये दुसर्या दिवशी त्या कोयरी मध्ये चिमुकली बोटे उठलेली  दिसत.
  
त्या दिवशी रात्री सगळ्या काकू ,चुलत भावंडे आणि कधी कधी काकादेखिल राहायला येत. रात्रीची घरातली जेवणे झाली कि सगळ्या काकू दुसऱ्या दिवशीची भाजी निवडणे, सवाष्णी करता गजरे बनवणे अशी तयारी करत जागायच्या. आम्ही तिघी बहिणी अश्या  वेळेस लहान भावंडाची काळजी घे, कोणाला जेवायला भरव, लहान भावंडाना  झोपव  आणि मुख्य म्हणजे गच्चीत सगळ्याच्या  गाद्या घाल अश्या  कामात असू. कामाच्या जोडीलाच गप्पा आणि चेष्टा यांना उत येई. कामे संपली तरी  गप्पा चालूच. एखादी काकू, जिचे मूल लहान आहे, ती आधीच  खाली घरात एखादी जागा पटकावून ठेवायची. पण जेव्हा गच्ची मध्ये  गप्पा रंगायच्या  तेव्हा मग तिला गप्पा सोडून जाववत नसे. मग तिला आम्ही चिडवायचो.  शेवटी रात्री १२.३०- १ वाजता आई सांगायची “आता सगळेजण झोपा, उद्या सवाष्ण जेवायची आहे”. एकदम गंभीरतेने ,उद्या खरेच एक मोठा सण  आहे ह्या भावनेने सगळे  झोपी जायचो.
 
गौरी जेवणाच्या दिवशी सकाळी हसत खेळत पण घड्याळाकडे लक्ष ठेवत स्वयंपाक चालायचा. आत्या सगळ्याची लाडकी होती. ती माहेरवाशीण म्हणून आलेली असायची. ‘व्हराड   निघालय  लंडनला’ मधला एक संवाद आहे ” वन्स..अहो वन्स, गेल्या न गे ssssssssssss ल्या …अजिबात कामाला हात लावायला नको “. तो आत्याला ऐकवून एखादी काकू तिची चेष्टा करायची. असे झाले की माझी आई मात्र थांबवायची. “माहेरवाशिणीला  चिडवू नका ग” म्हणायची.
 
या दिवशी जेवणात पंच-पक्वान्ने, पुरणपोळी, वरण-भात, मसाले-भात, कटाची आमटी, २ कोशिंबिरी, वाटली डाळ,पंचामृत, अळूवडी, पडवळ घालून कढी आणि २ भाज्या असा बेत असायचा. आम्ही ३ सवाष्णींना जेवायला बोलवायचे. सवाष्णी जेवायला आल्या कि मग गौरीची आरती होई. नैवैद्य दाखवला जाई आणि मग, सवाष्णी आणि घरातली  लहान मुले यांची पंगत बसे. मला या पंगतीत बसून स्वतःला लहान म्हणवून घ्यायला अजिबात आवडत नसे. म्हणून मग मी आई आणि काकुंना लाडी-गोडी लावून “मी तुम्हाला वाढायला मदत करते” सांगत त्या पंगतीत बसायचे टाळायची. त्यामुळे पुढे पुढे प्रसादाचे ताट तयार करणे, ताटाभोवती रांगोळी काढणे ही माझीच कामे झाली. जेवल्यानंतर  गौरीना गोविंद विडा द्यायचा.
 
दुपारी माझी आई, सगळ्या काकू आणि आम्ही मुली कित्येकदा गौरीकडे एकटक बघत बसल्याचे आठवते. लेकुरवाळी गौर गौरी-जेवणाच्या दिवशी इतकी इतकी प्रसन्ना दिसते कि ती गोष्ट फक्त अनुभवण्याची आहे. आम्ही अक्षरश गौरी समोर बसून राहायचो. निस्तब्ध. निशब्द.
 
गौरी जेवणाच्या  दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू. आईच्या आणि काकूंच्या माहेरच्या बायका (बहिणी, वहिनी), त्यांच्या मैत्रिणी, जवळपासच्या बायका असे करत कमीत कमी ५० बायका तरी हळदी-कुंकवाला येत. माझ्या आईची एक छान पद्धत होती. जिच्या ओळखीच्या बायका आल्या असतील,  तिने त्या बायकाशी बोलत बसायचे आणि त्यांना हळदी कुंकू द्यायचे. आणि बाकीच्या  जावांनी  किंवा आम्ही मुलींनी फराळाची  ताटे देणे, पाणी देणे किंवा  प्रसाद बांधून देणे ही कामे करायची. त्यामुळे जिच्या माहेरची माणसे  येत, त्यांच्याशी बोलायला तिला उसंत मिळे. 
 
मग गौरी विसर्जनाचा दिवस उजाडे. शेवटच्या दिवशी गौरी उतरवताना आई दहीभाताचा नैवैद्य दाखवायची आणि मुखवटे हलवून गणपती शेजारी ठेवी (हे मुखवटे अनंत चतुर्दशीला गणपतीबरोबर विसर्जित होत). नंतर बाकीची गौर आवरायची. गौरीची रिकामी जागा पाहून मनात कोठेतरी गलबल्या सारखे वाटे.
गौरीना  निरोप दिल्यावर त्या दिवशी  रात्री ११ वाजता घरचे सगळे पुण्यातले देखाव्याचे गणपती बघायला बाहेर पडत असू. आजूबाजूला राहणारे २-३ कुटुंबे, बाबांचे मित्र आणि त्यांची कुटुंबे असे बराच मोठा  घोळका जमा  होत असे. पुण्यातले  देखाव्याचे गणपती पाहणे हा एक मोठा सोहळा असे. संपूर्ण पुण्यात जत्रा भरल्या सारखे उत्साहाचे वातावरण असे. रस्त्यावर जथेच्या जथे लोटलेले असायचे. उत्साहाला अगदी उधाण आलेले असायचे.  रात्री १-२ वाजता देखील वाटायचे नाही की इतकी रात्र झाली आहे. ठिकठिकाणी खाण्याचे  पदार्थे विकणाऱ्या गाड्या असत.  आख्खे  पुणे रस्त्यावर आले आहे की काय असे वाटे. शिवाय बाहेरगावाहून सुद्धा लोक हे देखाव्याचे गणपती पाहायला येत. दर २-३ चौकामध्ये  सार्वजनिक गणपतीचा मांडव असे. आणि एखादा ऐतिहासिक किंवा पौराणिक देखावा किंवा विदूत रोषणाई …….सगळे बघायला  खूप मजा येई. गप्पा मारत, आणि वाटेत दिसेल ते प्रत्येक गोष्ट – काकडी, उसाचा रस, ओल्या शेंगा, शेंगदाणे खात खात रात्रभर भटकून मानाचे  ५ गणपती आणि इतर गणपती पाहून पहाटे  ४ -५ ला घरी येत असू. 
आणि मग वेळ यायची अनंत चतुर्दशीची.परत सगळे काका काकू, भावंडे ,मित्र मंडळी जमा होत. जोर जोरात आरत्या  म्हण्याची परत एकदा चढाओढ लागे. जड अंत कारणाने गणरायाला निरोप दिला जायचा. पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्या करता गणरायला आत्ताच आमंत्रण दिले जाई.
 
काळाच्या ओघात गाव बदलले, देश बदलला. आपली म्हणता येणारी माणसे फोन आणि इ-मेल मुळे हाकेच्या (क्लिकच्या) अंतरावर जरी असली तरी काही क्षण काही सण समारंभ तसेच साजरे करता येत नाहीत. मग अश्या वेळी मी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेले हे मोरपीस बाहेर काढते आणि मनाशीच म्हणते “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”.
Posted by: manimanasi | जुलै 25, 2010

आपण मराठी लोक

 आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे.सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली.

काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. मला त्या कार्यक्रमाविषयी काही लिहायचे नाही आहे .एखादी कॉन्सर्ट जशी मस्त रंगते तशीच रंगली.

 गाण्याच्या मध्येमध्ये निवेदक काही न काही गंमत करून वेळ भरून काढतात ना तसा तो निवेदक आला आणि ……… इथे किती गुजराथी श्रोते आले आहेत ?मग गुजराथी लोकांनी हात वर केले.मग त्यांच्यावर त्याने काही जोक्स केले. असेच तो निवेदक मग किती साउथ इंडिअन आहेत,किती पंजाबी आहेत असे विचारात होता,आणि त्या त्या प्रत्येक लोकांवर तो एक एक जोक करत होता.

 शेवटी तो आला महाराष्ट्रीयन लोकावर ? अरे किती लोक आले आहेत ? आम्ही हात वर केले.अजून बर्याच लोकांनी हात वर केले. मग तो म्हणाला……अरे वा! म्हणजे महाराष्ट्रातले लोक खर्च करू लागले आहेत तर! मराठी लोक म्हणजे लोक खर्च करायचा आहे म्हटल्यावर म्हणतात त्यात काय पहायचय? . TVवर पाहता येईल कि.

 आता गाडी इतक्यावर च थांबली नाही. त्याने अजून एक जोक आपल्या मराठी लोकांवर केला. हे मराठी लोक म्हणे हल्ली ज्याचे त्याचे मराठी मध्ये भाषांतर करू पाहतात.दिसला इंग्रजी शब्द कर भाषांतर. मध्यंतरी मुंबई च्या समुद्रावर कोणते तरी हरिकेन टायफुन येणार होते म्हणे पण ते आत मध्ये शिरूच शकले नाही. का तर…… मुंबई मधील लोक म्हणाले त्याला जोवर मराठी नाव आम्हाला सापडत नाही तोवर त्याला आत येवू देणार नाही.

अमेरिकेतील दहावी बारावी ची वर्षे

भारतामधील शिक्षण पद्धती ही अमेरिकेतील शिक्षण पद्धतीपेक्षा अनेक बाबतीत निराळी आहे.भारतामध्ये ज्याप्रमाणे दहावी आणि बारावीची वर्षे आयुष्याला दिशा देतात तशी इथे नववीपासून बारावीपर्यंतची चार वर्षे आयुष्याला दिशा देणारी असतात.अमेरिके मधला विद्यार्थी कोण कोणत्या आघाड्यावर लढत असतो? कशी असतात ही नववी ते बारावी ची चार वर्षे ? ह्याची ही तोंड ओळख.
भारतामध्ये पहिली ते चौथी प्राथमिक,मग पाचवी ते सातवी माध्यमिक,आठवी ते दहावी हायस्कूल,अकरावी बारावी जुनिअर कॉलेज आणि मग ३ वर्ष पुढे कॉलेज ची असतात.
अमेरिकेमध्ये पहिली ते पाचवी प्राथमिक,सहावी ते आठवी माध्यमिक,नववी ते बारावी हाय स्कूल ,मग पुढे ४ वर्षे under graduate ( ज्याला आपण कॉलेज म्हणतो )असे  असते.
अमेरिके मध्ये नववी ला विषय निवडी पासून सुरुवात होते.कॉलेज मध्ये गेल्यावर कोणत्या शाखेचा अभ्यास करणार असाल त्याला अनुसरून पूरक विषय घेता यावेत म्हणून नववी पासून अनेक ऐच्छिक विषय घेण्याच्या संधी उपलब्ध असतात.असंख्य पर्याय असतात निवडायला.नववी ते बारावी असे दर वर्षी विषय निवडत निवडत पुढे जायचे असते. इंग्लिश आणि गणित मात्र घ्यावेच लागतात.
प्रत्येक शाळेमध्ये counseling ची सोय असते.ज्या विषयात करिअर करायचे आहे त्या विषयाला संबंधित कोणते पूरक विषय घायचे  याकरता पालक आणि विद्यार्थी सल्ला मागू शकतात.शिवाय दर सहा महिन्यांनी या विषयावर पालकांच्या सभा देखील भरवल्या जातात.
अधिक  हुशार मुलांना AP  आणि HONORS असे प्रत्येक विषयामधील कॉलेजच्या दर्ज्याचे अभ्यासक्रम घेता येतात. हे अभ्यास क्रम निवडलेल्या मुलांना कॉलेज अडमिशनला फायदा होतो.मग कॉलेज मध्ये तो विषय पुन्हा शिकायला लागत नाही ज्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही वाचते.
भारता मध्ये जसे दहावी आणि बारावी चे वर्ष हे कॉलेज मध्ये अडमिशन मिळण्याच्या  दृष्टीने  महत्वाचे असते तसे इथे नववी पासून बारावी पर्यंत सगळी च वर्षे महत्वाची असतात. याचे मुख्य कारण म्हणजे नववी पासून ते बारावी पर्यंत चे सगळ्या  लहान मोठ्या परीक्षांचे मार्क हे कॉलेज च्या अडमिशन  करता धरले  जातात. शाळेमध्ये सतत वर्ष भर कोणत्या न कोणत्या  परीक्षा सुरूच असतात.आणि शिवाय एक वार्षिक परीक्षा असते. अनेक प्रोजेक्ट्स आणि प्रेझेन्टेशन याचे पण मार्क्स महत्वाचे ठरतात.त्यामुळे मुलांना सतत अभ्यासात सतर्क राहावे लागते.आणि मग या सर्व मार्कांची सरासरी काढून जो आकडा येतो तो म्हणजे  GPA. (सर्व साधारणपणे १००%= ४.० GPA.)
कॉलेजच्या प्रवेशा करता  हा आकडा  अर्थातच अतिशय महत्वाचा  असतो.
ज्यांना  आपला हा GPA वाढवायचा असती त्यांना दर वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये SUMMER SCHOOL सारखे पर्याय उपलब्ध असतात.
त्यामुळे बरीचशी  मुले सुट्टीमध्ये शाळेत जातात.SUMMER SCHOOL मध्ये पुढच्या वर्षाचा अंदाज यावा इतपतच अभ्यास शिकवला जातो.संपूर्ण वर्षाचा अभ्यास क्रम पूर्ण करण्याकडे  भर नसतो. Summer school मध्ये  परीक्षा नसते. आणि त्याचा कालावधी फक्त ६ आठवडे इतकाच असतो.

GPA च्या च जोडीला अजून एक आकडा  इथे महत्वाचा  समजला जाते आणि तो  म्हणजे SAT.SAT is  Standardized Test for College Admission
SAT ची परीक्षा द्यायची असते  अकरावी मध्ये .या मध्ये ENGLISH WRITING,ENGLISH READING,MATHS या ३ विषयांची परीक्षा घेतली जाते.सगळे मिळून २४०० मार्कांची परीक्षा असते.

SAT प्रमाणेच ACT अशी देखील एक परीक्षा  असते.काही कॉलेजेस ACT चा रिझल्ट पाहतात तर काही SAT चा.
SAT SUBJECT TESTS अशी  अजून एक परीक्षा  असते जी एखाद्या विषयाशी निगडीत असते. जो विषय घेवून UNDER GRAD/College करणार असता त्या विषयाची सब्जेक्ट टेस्ट  मुले देतात.
आणि दहावी मध्ये असते P-SAT. म्हणजे pre-SAT.ह्या परीक्षेचे मार्क मात्र  कशा मध्ये धरत नाहीत. ही SAT च्या सरावा करता असलेली परीक्षा आहे.

अमेरिके मध्ये कॉलेजला अडमिशन देताना मार्कांच्या इतकेच त्या विद्यार्थ्याचे  इतर व्यक्तिअमत्व कसे आहे याला  देखील अनन्य साधारण  महत्व असते.

ह्या करता सगळ्यात प्रथम पहिले जाते कि त्या मुलाचे खेळ किंवा कला या क्षेत्रात काही वाखाणण्या जोगे काम आहे का.
त्यामुळे इथे मुले सहावी सातवी पासून एक खेळ आणि एक कला निवडून त्या त्या गोष्टी मध्ये जास्तीत जास्त वर्ष शिक्षण घेवून  प्राविण्य मिळवतात.

हायस्कूल मध्ये व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या हेतूने वेगवेगळे असंख्य क्लुब्स  असतात. उदा. रोबोटिक्स,enviornment club,बुक क्लब,जर्नालिझम क्लूब.मुलांनी या अश्या (कमीत  कमी २) क्लब्स मध्ये भाग घेणे अपेक्षित असते. हे क्लुब्ज मुलेच चालवत असतात.त्या क्लूब द्वारे अनेक स्पर्धांमधून भाग घेत असतात.आणि या सगळ्या मुळे त्यांचे व्यक्तिमत्व विकास होतो. लीडर शिप गुण वाढीला लागतात.समाजात एकत्रित पणे काम करण्याची सवय होते.निर्णय क्षमता वाडीला लागते.
त्या नंतर नंबर लागतो ते म्हणजे त्या विद्यार्थ्याने समाजसेवा किती केली आहे.community serice/volunteering.समाज सेवा करण्याकरता वयाची १५ वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात. मुले नववी पास झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये हे volunteering तास मिळवतात. बारावीचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होई पर्यंत ह्या मुलांना ६० तास समाजसेवा पूर्ण करायची असते. पण या मध्ये सुद्धा स्पर्धा असते. त्यामुळे मुले २०० तास तरी समज सेवा करतात आणि आपला अडमिशन चा फॉर्म अधिकाधिक वजनदार करतात.
कोठे करता येते समाज सेवा ? त्या करता इथे समाजात अनेक संधी उपलब्ध असतात. पब्लिक लायब्ररी मध्ये,किंवा म्युझीअम्स,हॉस्पिटल्स मध्ये मुलांकरता खास पोझिशन्स असतात.काम हलके फुलके  असते. मुलांना समाजाचे ऋण मान्य करायची सवय हवी या करता ही अट असते.इथे कोठेही मुलांना बदल्यात पैसे मिळत  नाहीत. फक्त किती तास काम केले याची लेखी नोंद  मिळते.जो विषय घेवून under graduate करणार असाल त्या विषयाशी संबधित जर समाजसेवा केली तर अर्थात च त्याचा कॉलेज अडमिशनला  जास्त प्रभाव पडतो. उदा.जर मेडिकल ला जाणार असाल तर हॉस्पिटल मध्ये समाज सेवा केल्याने फायदा होतो.

अडमिशन करता पुढची गरज म्हणजे मुलांना एक एस्से ( निबंध ) लिहून द्यायचा असतो कि तुम्हाला ह्या च कॉलेज मध्ये अडमिशन का हवी आहे आणि तुम्ही करिअर करता हाच विषय का निवडला आहे या संदर्भात. पैसे घेवून एस्से लिहून देणारी किती तरी लोक आहेत.खरे तर हा एस्सी मुलांनी स्वत लिहिणे अपेक्षित असते.

कॉलेज अप्लिकेशनला  विद्यार्थी जोड देतात ते म्हणजे शिक्षकांचे शिफारस पत्र . इथे वशिले बाजी कोठेच चालत नाही. शिक्षक सुद्धा खिरापत वाटल्यासारखी हि पत्रे  देत नाहीत. अगदी विशेष कामगिरी केली असेल तर च हे शिफारस पत्र मिळते आणि  शिक्षक सुद्धा अगदी मोजक्याच शब्दात लिहून हे पत्र  देतात. त्यामुळे मुले अगदी नववी पासून नीट  व्यवस्थित पणे वागून शिक्षकांच्या मर्जीला उतरण्याकरता  धडपड करत असतात.
शाळेची वेळ असते सकाळी ८ ते ३ आणि नंतर बहुतांशी  मुळे  ३ ते ५ खेळाची  प्रक्टिस करतात. शनिवार रविवारी community service किंवा SAT ची तयारी किंवा इतर EXTRA CARRRICULAR ACTIVITIES. ह्या  सगळ्या मुळे अमेरिके मधील मुलांना  नववी पासूनच अनेक प्रकारची व्यवधाने असतात ती बारावी संपे पर्यंत. अकरावी ची एकदा SAT परीक्षा दिली कि खरे तर बारावी म्हणजे इथे आराम असतो. मुले अगदी मनसोक्त मजा करत असतात.
पण ही मजा फार काळ टिकत नाही.कारण बारावी चे वर्ष म्हणजे कॉलेज ची अडमिशन घायचे दिवस. अडमिशन काही १-२ महिने आधी मिळत नाही. ती सुरुवात होते बारावीच्या डिसेंबर महिन्यापासून.
Posted by: manimanasi | जुलै 9, 2010

इ-मेल

काही दिवसा पूर्वी मी एक स्फुट  कविता लिहिली होती.या कवितेची पार्श्व  भूमी अशी कि…..बरेच दिवसात कोणीही इमेल पाठवली नव्हती. मला इ मेल म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला लिहिलेला मजकूर अपेक्षित असतो.त्यामुळे वाट बघून बघून  लिहिलेली हि एक कविता.

ही कविता ४ जुलै २००९ च्या  सकाळ च्या  पैलतीर विभागात छापून आली होती.

******************************************************************************************************************************************************************************************

इ-मेल

नका पाठवू मला फॉर वर डेड मेल्स

र ला ट जोडलेल्या कविता

आणि ओढून ताणून केलेले जोक्स

नको आहे मला माहितीचा महा पूर

अथवा एखाद्या देव देवतांची चेन मेल

परंतु हे लक्षात ठेवा ,

करा मला तुमच्या सुख दुक्खात सामील

हसेन नाचेन तुमच्यासवे

अथवा देईन अश्रूंची साथ

करावयाचा आहे बंद मला हा रोजचा चातकाचा खेळ

कोणीतरी भेटेल म्हणून कॉम्पुतेरवर घालवायचा वेळ

असेन मी एका क्लिक च्या अंतरावर

जमले तर पाठवा मेल

अर्थात तुम्हाला वेळ झाल्यावर

सल्ला,आशीर्वाद,प्रेम यांची ओढ आहे मला

फक्त तेव्हढ्यासाठी    वाटे मला इ-मेल चा आधार भला

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.